Wednesday 19 July 2017

ज्ञानाच्या वाटेवर भेटलेल्या आसामींची आठवण .....



                                
आयुष्यात ज्याच्याकडून ज्ञान मिळतं तो शिक्षक. आई -बाबा, निसर्ग, अनुभव सगळेच आपले शिक्षक असतात. माझे  शिक्षक माझ्यासाठी देवाच्या  पण आधी येतात. मला देवांमध्ये आणि शिक्षकांमध्ये निवड करायला सांगितली तर मी शिक्षक निवडेन. कारण देवांपर्यंत   पोहोचण्याचा मार्ग शिक्षकच देऊ शकतात. देव म्हणजे नक्की काय हे माहीतच नसेल तर त्याची प्राप्ती होऊन सुद्धा आनंद मिळणारच नाही. शिक्षक ज्ञान देतात, म्हणून खऱ्या देवाचे ज्ञान सुद्धा त्यांच्याकडूनच मिळेल. मग जो देवाचे सुद्धा ज्ञान देतो तो देवच नाही का?
            
 माझ्या आयुष्यातले सगळे शिक्षक माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले. फक्त शाळेपुरतच्या ज्ञानापर्येंत ते कधीच सीमित नाही राहिले. मला त्यांच्याबद्दल विचार केला कि फार नवल वाटत दर वर्षी ६० मुलांमधून, प्रत्येक मूल कस आहे हे ते क्षणार्धात कसे ओळखतात, आणि तेही अगदी अचूक . 

                                  
 प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. काही शिक्षक स्वतःचे काही न राखता मुलांना अगदी सगळं देतात. तर काही शिक्षक काही गुपिते मुद्दाम उलगडत नाही. कारण मुलांनी स्वतःहून त्या वाटा  शोधल्यानंतरचा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना सुखावत असतो. माझ्या आयुष्यात ह्या दोन्ही प्रकारचे शिक्षक आले. आणि येताना माझ्या आयुष्यात अलौकीक क्षण घेऊन आले. स्वभाव वेगवेगळे पण ध्येय मात्र एकच. 
                                 
आयुष्यात शिक्षकांबरोबरचे नाते वेगळेच असते नाही का? तुम्हाला  आठवतात का तुमच्या आयुष्यातले शिक्षक? त्यांच्या आयुष्यातले त्रास त्यांनी कधीच व्यक्त केले नाही पण आमच्या आनंदात मात्र ते सहभागी झाले. शाळेच्या एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला पारितोषिक मिळाल्यावर त्यांच्या आई-बाबांना जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद शिक्षकांना व्हायचा आणि आजही होतो.  

                                   
 बऱ्याचदा आम्ही त्यांना काही सांगायच्या आधीच त्यांना ठाऊक असायचे आम्हाला काय सांगायचंय. खरंतर कधी त्यांचा उदास चेहरा पहिला  कि तो दिवसच नोकोसा वाटायचा. माझे परमेश्वराकडे  एकच मागणे आहे माझ्या शिक्षकांना  त्याने नेहमीच सुखात आणि आनंदात ठेवावे आणि त्यांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य लाभावे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत  लक्षात राहतील मला माझे शिक्षक . परमेश्वराचे   खरंच खूप आभार मला असे  शिक्षक दिल्या बद्दल.