गुपचूप येणारी, हळूच रमणारी, कुणासाठी एकटीच तर कुणासाठी एकत्र अशी प्रत्येकाच्या आयुष्यातली संध्याकाळ !!! दिसते तशी सावळी पण सावळ्यासारखीच पवित्र. समुद्रावर एकट बसलेल्या माणसालासुद्धा सोबत करणारी संध्याकाळ.
किती सुंदर असते ना संध्याकाळ! खरी चंद्रकोर लावलेली, वाऱ्याची साडी नेसलेली, अंधाराची शाल ओढलेली, ताऱ्यांचा हार घातलेली!!! त्यात ती समुद्रकिनारी असेल तर तिच्या पायातल्या सागराच्या लाटांच्या पैंजणांचा आवाज लोकांना सुखावून सोडल्याशिवाय राहत नाही.
दिवाळीतले संध्याकाळ मात्र सोन्याने सजते, दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. मित्रांच्या आणि परिवाराच्या एकत्रित सहवासात आनंदाने नाहते. हि सांज कंदिलाचे डूल घालून दीपमाळांचे हार घालून आनंद देते. अश्या ह्या संध्याकाळी तिच्याबरोबर कोणीच नसत. पण सगळ्यांना आनंद मात्र तीच देते.
स्वतः एकटी असणारी हि संध्याकाळ दुसऱ्यांना मात्र आनंद देते. पण लोक एकटी असताना तिच्याच कुशीत येऊन रडतात. माणूस एकटा असला कि या सांजेकडे रडतो, बोलत काही नाही पण मन हलके करतो. कित्येक जणांना हि संध्याकाळ जीव घेणारी भासते, जीव त्यांना नकोसा होतो आणि ते हळवे होऊन जातात. वाईट वाटत असते त्यांना कारण ते एकटे असतात. सायंकाळी हे विसरून मात्र जातात ते कि सायंकाळ आहे शेजारी.
संध्याकाळ तशी फार कमी जणांना प्रिय असते. प्रिया नसली तरीसुद्धा ती प्रत्येकाचे मन जपत असते. नावं ठेवतात लोक ह्या सांजेला पण आपली सगळी गुपित सांगत असतात नकळतच तिला. अश्या कित्येकांच्या दुःखांचा भार ती वाहते. सगळ्यांचे ऐकून घेते सांगत मात्र नाही. दारूचे अड्डे टाकणारे मात्र तिच्या नावावर कलंक लावतात.
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र साथ द्यायला कोणीच नसतं, तरीसुद्धा साथ देते निस्वार्थ अशी संध्याकाळ. म्हणून माझं सांगणं तुम्हाला आता एवढच, कधीतरी पाहून घ्या संध्याकाळचं ते रूप. तिच्याशी एकरूप होताना तुम्हाला कदाचित गाठता येईल तुमच स्वरूप !!!
No comments:
Post a Comment